
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा इशारा
कानडी शाळा हे महाराष्ट्राचे अपयश
दीपक कैतके
मुंबई : बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही आपली भूमिका असून, त्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. असे असताना आपल्याकडे असणारी गावे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न निषेधार्ह असून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जनतेला आवडलेले नाही. कर्नाटकाची ही भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी बुधवारी दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्रीही भाजपचे आहेत, त्यामुळे महाराष्ट्राबद्दल नक्की काय भूमिका आहे हे सरकारने ठोसपणे जनतेला सांगितले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavaraj Bommai) यांनी जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याची भावना व्यक्त केली असून, याबाबत कर्नाटक सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. बोम्मई यांच्या या विधानावर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत त्या वक्तव्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कानडी शाळा सुरू आहेत. कानडी शाळा सुरु असणे हे महाराष्ट्राचे अपयश आहे. त्याठिकाणी मराठी शाळा मोठ्याप्रमाणावर बांधायला हव्या होत्या. याला सरकारसोबत आम्हीही जबाबदार आहोत, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, समविचारी लोकं एकत्र येऊन समोरच्या पक्षाचा पराभव करून मतांची विभागणी होऊ नये, म्हणून तयारी करीत आहेत. परंतु यासाठी एका बाजूने तयारी चालत नाही, तर दोन्ही बाजूने तयारी हवी. याअगोदरही आम्ही आंबेडकरी चळवळीतील आठवले, गवई, कवाडे यांच्या पक्षांशी चर्चा केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत.
मुंबई—गोवा महामार्गावर पुस्तक लिहिले पाहिजे
दरम्यान, गेली अनेकवर्षें रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) चौपदरीकरणाच्या कामाचा अजित पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. नितीन गडकरी हे परिवहन खात्याचे आठ वर्ष मंत्री आहेत. यूपीए सरकार असल्यापासून मुंबई—गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, मात्र हा रस्ता अजून पूर्ण झालेला नाही. आता त्याबद्दल एक पुस्तकच लिहिले पाहिजे. ‘बॉम्बे टू गोवा’ जसा सिनेमा होता तशापध्दतीने एक ‘बॉम्बे टू गोवा’ पुस्तक लिहिले पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी लगावला. मुंबई-गोवा महामार्गाला कशाकरिता वेळ लागतोय, माहीत नाही? मुंबई-गोवा महामार्ग लवकर झाला पाहिजे. नितीन गडकरी यांना मी नागपूरला भेटल्यावर ‘तिसरा डोळा’ उघडा, असे सांगणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.