
मुकुंद लांडगे
मुंबई : घाटकोपर(Ghatkopar) पश्चिमेकडील अनेक भररस्त्यांवर गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यांच्यावर घाटकोपर पोलिसांनी आणि पालिकेने दोन आठवड्यांपूर्वी कारवाई केली होती. मात्र, तरीही आता पुन्हा फेरीवाल्यांनी या रस्त्यांवर दुकाने थाटल्याने घाटकोपरचा मोकळा झालेला श्वास गुदमरू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथून नागरिकांना(citizens) ये-जा करणे मुश्किल झाले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस घाटकोपर(पूर्व) तालुक्याच्यावतीने पूर्व आणि पश्चिम भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेच्या घाटकोपर एन विभाग कार्यालयाकडे एक लेखी पत्र देऊन करण्यात आली आहे.
पंधरवड्यापूर्वी सुरुवातीला घाटकोपर पोलिसांनी(Ghatkopar police), तर त्यानंतर पालिकेने बऱ्याच काळानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केले होते, त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. तर, पालिकेने ही कारवाई रोज करण्यात येणार, असे स्पष्ट केले होते. मात्र, काही दिवसांतच आता पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष डी. जे. गांगुर्डे(D. J. Gangurde) यांनी पालिका सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे आणि पालिका उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्याकडे या पत्रातून केली आहे.
गुन्हे होणार दाखल
कडक कारवाईनंतर जर फेरीवाले(hawkers) जुमानत नसतील, तर त्यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येईल, असे घाटकोपर एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांनी याबाबत बोलताना सांगितले होते, त्यामुळे याकडेही या पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.
‘हे’ आहेत फेरीवाल्यांचे पॉईंट
घाटकोपर पश्चिम येथील खोत गल्ली, तसेच बाजूचे अनेक वर्दळीचे रस्ते, रेल्वे स्थानक रस्ता परिसर, श्रद्धानंद रोड, महात्मा गांधी रोड, खोत गल्ली या रस्त्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसविलेल्या फेरीवाल्यांचे महत्वाचे पॉइंट आहेत. तर, पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात ना फेरीवाला क्षेत्रात फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथील ‘ना फेरीवाला क्षेत्र’ असा जो बोर्ड होता तो काढून फेरीवाल्यांनी हातगाड्या आणि स्टॉल लावले आहेत, असे सांगण्यात आले आहे.