
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. अशातच, या निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावे यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या निर्णयावरून अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
अजित पवार म्हणाले की, आम्हीही १५ वर्षे सत्तेत होतो. त्यावेळी मध्य प्रदेश, गोव्यात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही. अशाप्रकारे नवीन पायंडा पाडणे चुकीचे आहे. राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी(paid leave) घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करीत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी शेतकरी नुकसानभरपाई, मंत्रिमंडळातील नेत्यांचे आक्षेपार्ह विधान, तसेच इतर विविध विषयांवरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. याशिवाय, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी(Gujarat Assembly elections) दिलेल्या सुट्टीवरही भाष्य केले.
ते म्हणाले की, शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत, म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणे योग्य नाही. निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात. यापूर्वी असं कधी घडल्याचे मला आठवत नाही.
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली. राज्य सरकारने १ व ५ डिसेंबर रोजी पालघर(Palghar), नाशिक, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे.