
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) अमर नाईक टोळीतील तब्बल २३ वर्षे फरार असलेल्या एका गँगस्टरला आर ए किडवाई मार्ग पोलिसांनी(RA Kidwai Marg police) अटक केली आहे. रवींद्र मारुती ढोले असे त्याचे नाव असून, सध्या तो सक्रीय नसला तरी दादर न्यायालयातील सुनावणीस हजर राहत नव्हता, त्यामुळे त्याला अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. अखेर त्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील विठ्ठलवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यात आणि गँगस्टर(gangster) अमर नाईक टोळीत तो सक्रीय होता. त्याच्यावर रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद होते. याबाबतचा १९९९ मधील हा खटला सत्र न्यायालयात सुरू होता. त्यावेळी हा आरोपी राठी, कोहिनूर चाळ, महात्मा फुले रोड, नायगाव, दादर(पूर्व) येथे राहत होता. मात्र, नंतर तो फरार झाला होता, त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.
दरम्यान, खटला सुरू असतानाच आरोपीने अटकेनंतर जामीन मिळाल्यावर मिलची रूम विकून निघून गेला होता. मात्र, त्याचे छायाचित्र व कोणतीही अनुषंगिक माहिती पोलिसांच्या अभिलेखावर उपलब्ध नव्हती, त्यामुळे एम आर ए पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे हे त्याच्या मागावर होते. आरोपीचे गुन्ह्यातील तत्कालीन साथीदार आणि जामीनदार मयत झाले आहेत. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात असंख्य अडचणी येत होत्या. मात्र, त्याची माहिती खबऱ्याने दिल्यावर त्याला जुन्नर/पुणे(Junnar/Pune) येथून अटक करण्यात आली. ही कामगिरी परिमंडळ-४ चे पोलीस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, माटुंगा विभागाचे सहायक आयुक्त संजय जगताप, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमूद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) लिलाधर पाटील, महेश लामखडे यांच्यासह अंमलदार नारायण कदम, सुरेश कडलग व रवींद्र साबळे यांनी केली.