
Indiagroundreport वार्ताहर
हिंगोली : गेल्या चार वर्षांपासून खटकाळी रेल्वे क्रॉसिंगवर(Khatkali railway crossing) उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ज्याप्रमाणे बिरबलची खिचडी कधी शिजणार?, असा प्रश्न निर्माण झाला होता, त्याचप्रमाणे हा पूल कधी होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आज सदर पुलाचे ‘बिरबल का पूल’ असे नामकरण करून उपरोधिक आंदोलन केले.
हिंगोली-कळमनुरी मार्गावर(Hingoli-Kalamnuri route) हिंगोली नजिक खटकाळी रेल्वे क्रॉसिंगजवळ चार वर्षांपासून उड्डाणपुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. सदर काम कंत्राटदाराकडून अतिशय संथगतीने केले जात आहे. त्यातच आता जिल्हाधिकारी यांनी पुलाखालील मार्ग बंद केला असून, खटकाळी हनुमान मंदिराजवळील रेल्वे पटरी खालून जाणारा अरुंद रस्ता उपलब्ध करून दिला आहे, यामुळे याठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होत असून, त्याचा नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पुलाच्या कामाची गती पाहता हा पूल नागरिकांच्या सेवेत कधी तयार होईल? हा गंभीर प्रश्न आहे. ज्याप्रमाणे बिरबलाची खिचडी कधी शिजलीच नव्हती, त्याप्रमाणे हा पूल कधी पूर्ण होणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी वैतागलेल्या हिंगोलीतील नागरिकांनी आज शनिवारी सदर पुलाचे ‘बिरबल का पूल’ म्हणून नामकरण करीत उपरोधक आंदोलन केले. यानंतर तरी प्रशासनाला(administration) जाग येऊन पुलाचे काम गतीने व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


