Beijing : चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरसचा धुमाकूळ

0
168
Beijing: Corona virus outbreak again in China

अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर
Indiagroundreport वार्ताहर
बीजिंग : (Beijing)
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. चिंताजनक बाब म्हणजे, तब्बल सहा महिन्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा(Corona) पहिला मृत्यू झाला असून, अनेकजण व्हेंटिलेटरवर आहेत. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच, जास्तीत जास्त टेस्टिंग आणि क्वारंटाईनवरही भर दिला जात आहे.

चीनच्या(China) बीजिंग शहरात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी बीजिंगमध्ये कोरोनाचे तब्बल ९६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी बीजिंगमधील ६२१ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. हीच बाब लक्षात घेता चिनी सरकारने बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

इतकेच नाही, तर कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाईन धडे दिले जावे, असा आदेश चिनी सरकारने दिला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चीन सरकारने लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात(district) जाण्यापासून रोखले आहे.

सरकारी आदेशानुसार, रविवारी बीजिंगमधील अनेक शॉपिंग मॉल्स(shopping malls) बंद ठेवण्यात आले होते, तर अनेक मॉल्स उघडण्याच्या वेळेत बदल केले आहेत. याशिवाय, अनेक रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करण्याची सुविधाही रद्द करण्यात आली आहे. चाओयांग जिल्हा अधिकार्‍यांनी येथील कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्कफ्रॉम होमची(work-from-home) सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. काही उद्याने आणि जिमही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.