
Indiagroundreport वार्ताहर
Ambernath : अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर(Anandnagar) औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ३३ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागातील अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी या आरोपींवर मोक्का कलमांतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रकरणावरून झालेल्या राड्यानंतर आरोपींवर पोलिसांनी कारवाईचा फास अधिक घट्ट झाला आहे.
बोहनोली गाव(Bohnoli village) येथे आयोजित बैलगाडा शर्यतीच्या चर्चेसाठी राहुल पाटील हे त्यांचे सहकाऱ्यांसह खाजगी वाहनातून जात असताना अंबरनाथ पूर्वेतील सुदामा हॉटेल आणि एमआयडीसी कार्यालयासमोर रस्त्यावर गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांनी पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळया झाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादीसोबत असलेल्या इतर वाहनांची मोडतोड केली, म्हणून गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांविरुध्द अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली होती, तर २३ फरार होते.
याप्रकरणी टोळी प्रमुख गुरुनाथ पंढरीनाथ फडके आणि त्याचे साथीदार यांनी राजकीय व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याकरिता अग्निशस्त्र, प्राणघातक हत्यारांसह सातत्याने गैरकायद्याची मंडळी जमवून बेकायदेशीरपणे कृत्य करून संघटितपणे हिंसाचाराचा अवलंब करीत असल्याचे पोलिसांच्या(the police) निदर्शनास आले होते. तसेच नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरात गंभीर स्वरूपाचे ज्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, धमकाविणे, शिवीगाळ व मारहाण करणे या स्वरूपाचे गुन्हे सातत्याने केले असल्याचेही पोलिसांच्या समोर आले होते. या टोळीच्या गैरकृत्यांना आळा घालण्याकरिता प्रचलित कायद्यान्वये त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कलमांतर्गत कारवाईची मागणी स्थानिक पोलिसांनी केली होती. त्यानुसार, या ३३ आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे(Dattatray Shinde) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अन्वये कारवाई करण्याची पूर्व मंजुरी दिली आहे.