MUMBAI : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे पोलिसांकडून प्रवासी वाहतूक नियमन

0
181

मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या पार्श्वूमीवर मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी वाहतूक नियमन अधिसूचना काढण्यात आली आहे. दादरच्या चैत्यभूमीवरील स्मारकाचे दर्शन घेणे सुलभ होऊन गर्दी टाळण्यासाठी हे नियमन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बाबासाहेबाना आदरांजली अर्पित करण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातील तसेच देश विदेशातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठया संख्येने लांब पल्ल्याच्या व उपनगरीय रेल्वे गाडयांनी दादर मुंबई येथे दरवर्षी येत असतात. मात्र गेल्या २ वर्षांत कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घालण्यात आलेल्या निबंधांमुळे आंबेडकरी अनुयायांना बाहेरुन मुंबईमध्ये येणे शक्य झालेले नाही. असे असले तरी यावेळी हे निर्बंध उठवून रेल्वेसेवा पुर्ण क्षमतेने चालू आहे. सद्या रेल्वेतील प्रवाशांची संख्या जवळपास ७२ लाखांपर्यंत असून, त्यात दररोज १० ते १५ हजार नवीन पासधारकांची वृध्दी होत आहे. त्यामुळे येत्या ६ डिसेंबरपर्यंत ही संख्या ७५ लाखापर्यंत पोहचणे अपेक्षित आहे त्यामुळे यावर्षी ट्रेनने येणारे आंबेडकर अनुयायी पूर्ण क्षमतेने मोठया प्रमाणात उस्फुर्तपणे येणे अपेक्षित आहे. त्यामुळे परिणामी ५ आणि ६ डिसेंबर रोजी रेल्वेचे नियमित प्रवाशी व दर्शनासाठी आलेले अनुयायी हे एकत्र आल्यामुळे स्टेशन परिसरात अफाट गर्दी होऊ नये याची काळजी रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी व स्थानकाबाहेर पडण्यासाठी मुख्यत्वे दादर मध्य रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पादचारी पुल, उत्तर दिशेकडील स्कायवॉक पादचारी पुल, दक्षिण दिशेकडील महानगर पालिका पादचारी पुल यांचा वापर करण्यात येतो. या दोन दिवशी दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावर मोठया प्रमाणावर गर्दी निर्माण होणार असल्याने रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवाशी व अनुयायी तसेच बाहेरुन रेल्वे स्थानकात येणारे प्रवाशी व अनुयायी हे एकमेकांसमोर येऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यातून चेंगराचेंगरी सारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या दिवशी पादचारी पुलांच्या वापराबाबत काही निर्बंध घालण्यात येण्याची सूचना रेल्वे पोलिसांनी संबंधितांना केली आहे.