
प्रशांत बारसिंग
मुंबई : सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतक-यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले.
कापूस उत्पादकांच्या(cotton growers) केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसंदर्भात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) यांनी शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वत्तोपरी सहकार्य करणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. दुष्काळ कालावधीत नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रूपये वितरीत केले असून, १० हजार कोटीपर्यंत हे सहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सलग पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांनाही मदत मिळावी यासाठी नियम शिथिल करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे पीकविमा योजनेअंतर्गत शेतमजुराला विमा संरक्षण देता येईल का, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


