Mumbai : आत्मविश्वास नसला की ज्योतिष्याकडे जावे लागते; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
126
Mumbai : One has to go to an astrologer if there is no confidence; Sharad Pawar's challenge to the Chief Minister

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं आणि राज्याचे भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या कृतीचा अनिसने जाहीर निषेध केला असून, विरोधकांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे.

स्वत:बद्दल आत्मविश्वास नसला की ज्योतिष्याकडे जावे लागते, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला. याशिवाय, त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील टीका केली आहे. शिवरायांबाबत वक्तव्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मर्यादा सोडली, असे म्हणत त्यांनी राज्यपाल(Governor) भगतसिंह कोश्यारींवरही निशाणा साधला आहे.

राज्यातील शिंदे—फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis government) दोन महिन्यात कोसळेल का?, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. मी काही सांगू शकणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही. तसेही मी हात दाखवायला कुठे जात नाही.

आपण आता नवीन गोष्टी पाहत आहोत. जे महाराष्ट्रात कधी नव्हतं, असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

आसाममध्ये काय घडले हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचे मी वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाख​विणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत, पण या गोष्टीचा स्वीकार करीत नाही हे जनता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल(Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह विधानाचाही शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचे असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली, त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी याची दखल घ्यायला हवी, असेही शरद पवार यांनी म्हटले.