
प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) संयुक्त महाराष्ट्रासाठी राज्यातील जनता एकजुटीने लढेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केले.
मुंबईत(Mumbai) प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वक्तव्य निंदनीय असून, त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. धिक्कार करतो. कर्नाटकचे(Karnataka) मुख्यमंत्री भाजपचे असून, त्यांनी अशी वक्तव्ये तात्काळ थांबवावित. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवरावे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्ये महाराष्ट्र(Maharashtra) सहन करणार नाही. जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवरचा दावा त्यांच्यासाठी ‘खयाली पुलाव’ ठरेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातली 814 मराठी भाषक गावे महाराष्ट्रात येणे हा खरा मुद्दा आहे. ही गावे महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तिसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढेल.