
भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची केली मागणी
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : शेतकरी नेते राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटविण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात एक पत्र राष्ट्रपती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची अब्रू घालवली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खंत व्यक्त केली आहे.
राज्यपाल(Governor) भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय पक्षांसह अन्य संघटनांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे, त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याच्या पाहायला मिळत आहे.
राज्यपालांना हटविण्यासाठी मुंबई हायकोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू(President Draupadi Murmu) यांना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
राजू शेट्टी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, राष्ट्रपतींना भेट मागितली होती, परंतु मिळाली नाही. राज्यपालांनी पदाची अब्रु घालवली आहे. कधी मराठी माणसाचा, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त हे राज्यपाल आहेत. त्यांना महाराष्ट्रातून हटवावे, अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे.
छत्रपतींचा अपमान होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर सत्ताधाऱ्यांचे शिवाजी महाराजांवर(Shivaji Maharaj) किती बेगडी प्रेम आहे हे स्पष्ट होतंय. महापुरूषांवर चिखलफेक करून त्यांची उंची कमी होणार नाही हे लक्षात घ्यायला हवे, असेही राजू शेट्टी म्हणाले.


