Mumbai : मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीला केली अटक

0
185
Mumbai: Motorcycle stealing inn gang arrested

12 वाहने पोलिसांच्या ताब्यात
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
घाटकोपर(Ghatkopar) परिसरातील चिरागनगर, पंतनगर, तसेच पार्क साईट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकली चोऱ्यांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. या घटनांशी संबंधित टोळीच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १२ वाहने ताब्यात घेतली असून, त्यांच्यावर सध्या इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले नसले, तरी पोलीस तपास करीत असल्याची माहिती परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.

या परिसरात गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने घाटकोपर पोलीस ठाण्यातील(Ghatkopar police station) गुन्हे प्रकटीकरण पथकाने गेल्या नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासातून या टोळीचा माग काढला. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अंकित रवीकांत मिश्रा, किरण शिवाजी पाटील आणि गणेश रामचंद्र सावंत या आरोपींना अटक केली. आरोपींनी चोरलेल्या ३ बुलेट, ६ ॲक्टिव्हा अशा एकूण ९ दुचाकी आणि गुन्हा करताना वापरलेल्या ३ मोटारसायकली अशा एकूण १२ दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद नेर्लेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके, पोलीस निरिक्षक(गुन्हे) प्रमोद कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यासह इतर अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.