
समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे पालिकेच्या नगर अभियंता विभागाला(City Engineer Department) हाताशी धरून रस्ता मंजूर केला, त्यासाठीचा निधीही खर्च केल्याचे दाखविले, पण हा कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेला काँक्रीटचा रस्ता भिंत बांधून बंदिस्त करीत चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा रस्ता ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोकमान्य नगर प्रभाग समिती येथील आहे.
लोकमान्य नगर परिसरातील तरण तलावाला लागूनच या रस्त्यावर सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा रस्ता सेवा रस्तामध्ये येत असून, या प्रभाग समितीतील कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी कोट्यवधी खर्च करून हा बांधलेला रस्ता भिंत बांधून बंदिस्त केला असल्याचा आरोप मनसेचे(MNS) जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे. तसेच, या रस्त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून या रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरच भिंत बांधून हा रस्ता पूर्णपणे बंद केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या प्रश्नी नगरअभियंता यांना वारंवार निवेदन देऊनही हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतरही हे काम आम्हाला माहीत असून, या जागेची ठाणे पालिका मालक आहे, त्यामुळे त्या जागेवर काही करू शकतो अशी उत्तरं देत हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या बांधलेल्या भिंतीबाबत महापालकेच्या कोणत्याही दस्ताऐवजवर नोंद नसून, कोणतीही निविदा नसताना ठेकेदाराकडून बेकायदेशीरीत्या बांधलेली असल्याचे समोर आले आहे. पालिकेचे अधिकारीच पदाचा गैरवापर करीत सेवा रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करीत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी हक्कासाठी कोणाचे दरवाजे ठोठवायचे?, असा प्रश्न ठाणेकरांना(Thanekars) पडला आहे.
पालिकेचे अधिकारी बेकायदेशीर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार धक्कादायक असून, पालिका आयुक्तांनी याप्रश्नी चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. तसेच, हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बांधला असून, तो त्यांच्यासाठी खुला करावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे स्वप्निल महिंद्रकर(ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, मनसे) यांनी म्हटले आहे.


