Mumbai : धारावीचा भूभाग बळकावायचा हा भाजपचा डाव

0
200

भाजप दोन लाख करोडचा घोटाळा करू पाहतेय

प्रीती शर्मा मेनन यांचा सत्ताधारी भाजपवर आरोप

दीपक पवार
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून, पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीय यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र भाजप रचत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन(Preeti Sharma Menon) यांनी केला आहे.

पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, २०३४ च्या डीसीपीआर ३३ (१०) (ए) नुसार, धारावीचा व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेटमध्ये प्रस्तावित विकास यात केवळ झोपडपट्टीचाच समावेश नाही तर सरकारी जमिनीचाही समावेश आहे. जसे की बेस्ट डेपो, तसेच अतिसंवेदनशील महाराष्ट्राची मिठी नदी आणि माहीम खाडीच्या संगमावर वसलेले निसर्ग उद्यान आहे. हा भाग ५१२ एकर म्हणजे २ कोटी २५ लाख २८ हजार चौरस फूट आहे. यांचे बांधकाम क्षेत्र ९,०१,१२,००० चौरस फूट इतका धारावी परिसर व्यापलेला आहे. आताच्या घडीला धारावीत(Dharavi) दहा लाख लोक राहतात. धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून, राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत. याच धारावीची ओळख पुसण्यासाठी हा प्रकल्प भाजप आपल्या निकटवर्तीयांच्या घशात घालू इच्छिते आहे. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मत पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, धारावीचा विकास हा भाजपच्या आवडत्या मित्रांकडे जाईल किंबहुना सल्लागार नेमण्यासाठीही बैठकीत गुजरातमधील सल्लागाराला पसंती देण्यासाठी जाचक अटींवर पाणी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

धारावीत असलेल्या व्यवसायचे काय?

धारावी हे चामडे, वस्त्र, फर्निचर, अन्नप्रक्रिया यासाठी औद्योगिक केंद्र असून, याकरिता विकास आराखड्यात कोणताही अजेंडा नाही. या व्यवसायांना सामावून घेतल्यास त्याचा परिणाम लाखो मुंबईकरांच्या रोजीरोटीवर होणार आहे.

पर्यावरणीय आपत्ती

महाराष्ट्र निसर्ग उद्यान जे मिठीच्या जैवविविधतेचे संरक्षक आहे. माहीम खाडी(Mahim Bay) नष्ट होईल. हे प्रचंड काँक्रिटीकरण सर्व सुनिश्चित करेल. आजूबाजूच्या भागांना मुंबईच्या पुराच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.