Thane : मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

0
212

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे महापालिकेतील(Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील विद्यमान वेतनश्रेणी व ग्रेड पे संरक्षित करुन त्याप्रमाणे सुधारित वेतन निश्चित करण्याबाबतचा शासननिर्णय आज प्रसिद्ध झाला. या शासन निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद करीत याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. शासननिर्णय प्रसिद्ध होताच ठामपा कर्मचाऱ्यांनी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी सभागृहनेते अशोक वैती, तत्कालीन गटनेते नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, तत्कालीन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे देखील आभार व्यक्त केले आहे.

सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी सातत्याने कर्मचाऱ्यांची बाजू शासनदरबारी मांडल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी आज माजी महापौर नरेश म्हस्के यांचे पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या काही पदांच्या वेतनश्रेणी या शासनाकडे असलेल्या वेतनश्रेणीशी समकक्ष आढळून न आल्याने या पदांबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. परंतु, अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याबाबत कमर्चारी सातत्याने माजी महापौर नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांच्याकडे तक्रार करीत होते. कोणत्याही संवर्गाचे वेतन कमी न करता कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीचा फेरविचार करण्याबाबतचा पत्रव्यवहार माजी महापौर नरेश म्हस्के व नजीब मुल्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला होता. परंतु, वर्ग 1 ते 4 मधील प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत निर्णय होण्यास विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत नव्हता. याबाबत माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर्मचाऱ्यांची ही मागणी लावून धरली होती. आज अखेर या मागणीला यश आले असून, वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग(Seventh Pay Commission) लागू करण्याचा शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.