India Ground Report

Thane : ‘ताप आला की पाल्याला ताबडतोब आरोग्यकेंद्रात घेऊन या, उशीर जीवावर बेतू शकतो’

महापालिका आयुक्तांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

समर प्रताप सिंग
ठाणे : पाल्याला ताप आला तर तो कसला याची वाट न पाहता, त्याला लगेच नागरी आरोग्यकेंद्रात घेऊन यावे. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. उशीर झाला तर ते पाल्याच्या जीवावर बेतू शकते, असे कळकळीचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

हेल्पलाईन २४ तास सुरू

गोवरबद्दल कोणतीही माहिती हवी असेल, तर ७३०६३३०३३० या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. ही हेल्पलाईन २४ तास सुरू आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यास तेही हेल्पलाईन वर सांगावे. रुग्णवाहिका घरी पाठविली जाईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

ठाण्यातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, डीन डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना कुमावत, नागरी आरोग्यकेंद्र समन्वयक डॉ. राणी शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वेक्षण पहिला आणि दुसरा टप्पा

गोवरचे रुग्ण लवकरात लवकर शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण १९ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. ही पहिली फेरी २४ नोव्हेंबरला पूर्ण होईल. दुसरी फेरी २५ तारखेला सुरू होऊन ३० तारखेला पूर्ण होईल. गोवरच्या प्रभावाचा काळ सात दिवसांचा असतो. १० दिवसात प्रत्येक घर दोनवेळा कव्हर केले गेल्याने ज्यांना गोवरची लक्षणे आहेत अशी सगळी मुले शोधता येतील. हे सर्वेक्षण कौसा, एम. एम. व्हॅली, मुंब्रा आणि कळवा येथे सुरू आहे, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

खाजगी डॉक्टरांनी तत्काळ माहिती द्यावी

बरेच रुग्ण हे प्रथम खाजगी डॉक्टरांकडे जातात, त्यामुळे त्यांना गोवरबद्दल खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गोवर सदृश लक्षणे असलेला रुग्ण आला, तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्यकेंद्राकडे लगेच द्यावा. खाजगी डॉक्टर आणि आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी गोवरची लक्षणे असलेला रुग्ण आला तर काय करायचे याची एक कार्यपद्धती तयार करून ती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आशासेविकांना अतिरिक्त मोबदला

शून्य ते पाच या वयोगटातील सर्व बालकांची यादी उपलब्ध असते. आशासेविकांनी सर्व बालकांचा पाठपुरावा करून गोवर असेल, तर नागरी आरोग्यकेंद्रात त्याची माहिती द्यावी. त्यासाठी आशासेविकांना अतिरिक्त मोबदला देण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच, स्थलांतरित नागरिकांमधील पाच वर्षांखालील बालकांची नोंद करून घ्यावी. त्यांचा आशा सेविकांमार्फत आढावा घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

रुग्णांसाठी खाटांची कमतरता नाही

आपल्याकडे नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत ४४ रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी १२ निकाल आलेत. त्यात ५ रुग्ण गोवरचे निघाले. साधारण हा अंदाज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच, पार्किंग प्लाझामध्येही विशेष वॉर्ड तयार आहे. रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर रुग्णालयात अतिरिक्त बालरोगतज्ज्ञ, अतिरिक्त शिकाऊ डॉक्टर आणि अतिरिक्त नर्सेस यांची उपलब्धता करण्याचे निर्देशही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. तसेच, गोवरची स्थिती लक्षात घेता नोव्हेंबरअखेर करार संपणाऱ्या रुग्णालयातील नर्सेसना मुदतवाढ देण्यात असल्याचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

औषध आणि इतर साधनसामुग्री यांची काहीही अडचण नाही. सर्व बालरोगतज्ज्ञ सतर्क राहून हे रुग्ण काळजीपूर्वक हाताळले जातील असे पहावे.

लसीकरण तत्काळ करा

गोवर विरोधी लढ्यात लसीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. चारही आरोग्यकेंद्रे आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे सातही दिवस लसीकरण सुरू आहे. दुर्देवाने, काही पालक अजूनही लसीकरण करण्यास तयार नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यावे, आपण लसीकरणाला नकार देणे म्हणजे आपल्या बालकाचा जीव धोक्यात घालणे. लसीकरणात काही अडचणी आल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत अवश्य घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांनी सर्वेक्षण गटाला सहकार्य करावे. खरी माहिती द्यावी. त्यात सगळ्यांचे हित आहे. तसेच, लसीकरण केले नसेल, तर तत्काळ करून घ्यावे. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनीही जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे अभिजीत बांगर(आयुक्त, ठाणे महानगरपालिका) यांनी म्हटले आहे.

Exit mobile version