
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते, पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Aawhad) यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा दिलेला इशारा याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी हाताने धरून एका महिलेला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते, पण त्या पक्षाकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी आजच आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविषयी नुकताच एका नेत्याने अपशब्द उच्चारला. भारतीय जनता पार्टी त्याचे कधीही समर्थन करणार नाही, पण त्यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओत दिसत असूनही समर्थन करतात. हा त्या पक्षाचा दुटप्पीपणा आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य जितके चूक आहे तितकेच त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करणेही चूक आहे. शहरात असे होत राहते, असे ज्यांनी म्हटले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. ते गृहमंत्री असताना राज्यात दादागिरी चालू देणार नाही. भाजप हे सहन करणार नाही.