
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी पाऊल टाकले आहे.
पुण्यातील(Pune) नवले पुलावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. प्रशासनाने बैठकी घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, तसेच रस्त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे की, मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर(Mumbai-Bangalore National Highway) सातत्याने अपघात होत असून, यासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात मी वेळोवेळी बैठकीद्वारे, तसेच पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. सदर ठिकाणी मी वेळोवेळी भेट देऊन पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपाययोजनाही सुचविल्या आहेत.
नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेगमर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत, तसेच विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर बिल्कर देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग(curb painting) करावे, वाहन चालकांना डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लो, अपघात प्रवणक्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक लावण्यात यावेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या सारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाययोजना तातडीने पूर्ण होणेबाबत, कार्यवाही होणेबाबत मागणी केली होती. स्वामीनारायण मंदिर ते वडगाव पूल असा पूल बांधणे आवश्यक आहे, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात लिहिले आहे.
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच नवले पूल परिसरात २० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा व अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माझी आपणास विनंती आहे की, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
तसेच, सदर बैठकीचे नियमित आयोजन करून रस्ते सुरेक्षेच्या समस्या मार्गी लावणेबाबत आढावा घेऊन सूचनांनुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.