India Ground Report

Navi Mumbai : संविधानाची प्रत सरकारकडून घरोघरी निशुल्क देण्यात यावी

आंबेडकरी विचारवंत प्रा. डाॅ. जी. के. डोंगरगावकर यांची मागणी
दीपक पवार
खारघर : (Kharghar)
भारत सरकारने भारताचे संविधान(Constitution of India) याची प्रत देशातील सर्व कुटुंबात विनामूल्य वितरीत करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आंबेडकरी विचारवंत प्रा. डाॅ. जी. के. डोंगरगावकर यांनी केली आहे.

या परिसरात मान्यता प्राप्त ३२ शाळा आहेत, शनिवारी साप्ताहिक सुट्टी होती. ३२ पैकी अनेक शाळेने संविधान दिनाचे(Constitution Day) आयोजन केले नसल्याचे प्रजासत्ताक विद्यार्थी परिषदेचे नवी मुंबई पदाधिकारी किशोर पाटील, राजरत्न डोंगरगावकर यांनी एका पत्रकाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

२६ नोंव्हेबर रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्याच्या शासनाचं परिपत्रक असताना ज्या शाळेने ‘संविधान दिन’ साजरा केला नाही त्यांची मान्यता रद्द करावी, असे शासनास पत्र पाठविण्यात आल्याचे किशोर पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, शिक्षण अधिकारी केवळ संविधान दिन साजरा करा म्हणून पत्र पाठवितात त्याची अमलबजावणी झाली का नाही याची पडताळणी करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची मागणी प्रजासत्ताक विद्यार्थी परिषदेने केली आहे.

नवी मुंबईतील खारघरमध्ये(Kharghar) सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली आज रोजी काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधानाचं उद्देशिका असलेले संविधान रथ हे संविधान रॅलीमधील मोठं आकर्षण होतं. संविधान रॅली उत्सव चौक, शिल्प चौक या मुख्य रस्त्यातून सेंन्ट्रल पार्क, मेट्रो रेल्वे स्टेशनजवळील सत्याग्रह मैदानात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये माजी जिल्हा न्यायधीश यशवंत चावरे यांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेची सर्व विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. संविधान रॅलीत ‘संविधानाचा विजय असो!’, ‘संविधान समितीचा विजय असो!’, ‘सत्यमेव जयते!’, ‘संविधान दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!’, ‘संविधानाची कास धरू, विषमता नष्ट करू!’, ‘स्वातंत्र, समता, बंधुत्व, न्याय, संविधान सांगते एकात्मता!’, ‘संविधानाने दिला मान, समान संधी, समान दर्जा! भारताचे संविधान, तमाम भारतीयांचा अभिमान!’, ‘नका कोणी घाबरू, सर्वांनी संविधान राबवू!’, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ योगदान, भारताचे संविधान!’, ‘हक्क बजावू कर्तव्य पालन करू!’, ‘भारतीय लोकशाहीचा विजय असो!’, ‘संविधानाची हमी, उच्च-नीच नाही कोणी!’, ‘लोकशाहीचे भान, देते भारताचे संविधान!’, ‘संविधान मूलक उभारू, भारत’, असे घोषवाक्य असलेले फलक रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हाती होते.

संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि मुंबई महानगर प्रदेशातील संविधानप्रेमी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. संविधान समितीचे अध्यक्ष डाॅ. राजेद्र प्रसाद यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) हे संविधान प्रदान करीत असल्याचे तैलचित्र संविधान रथाच्या मध्यभागी लावण्यात आले होते. मूलभूत आधिकार, नागरिकाचे कर्तव्य आणि 395 कलम असलेले संविधान विद्यार्थ्यांच्या हाती होते. संविधानाची मिरवणूक संविधान रथातून काढणारी नवी मुंबईतील हे पहिले महाविद्यालय असल्याचा दावा महाविद्यालयाच्या प्राचार्या नेहा राणे यांनी केली.

संविधान रॅलीचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. समारोपप्रसंगी माजी न्यायाधीश यशवंत चावरे यांनी संविधान रॅलीतील सर्वांना संविधान उद्देशिकेची प्रत दिली. तसेच, संविधान उद्देशिकेचे पठण त्यांनी केले, त्यांनतर विद्यार्थ्यांनी त्याचे पुर्नपठण केले.

संविधान रॅलीला संबोधित करताना सांगण्यात आले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील योगदान आणि संविधान सभेतील सदस्यांचा संविधान चर्चेत झालेला संवाद मोठ्या मार्मिक पद्धतीने मांडला, साध्या सोप्या भाषेत संविधानातील 395 कलमाची त्यांनी मांडणी केली.

महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून संविधान रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये सिध्दार्थ मल्टिपरपज् रेसिडेन्शल हायस्कूल, डाॅ. जी. के. डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल, सत्याग्रह महाविद्यालय आणि सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय यातील विद्यार्थी सहभागी होते. तसेच आंबेडकर चळवळीतील नरसिंग कांबळे, ॲड. किशोर कांबळे, एम. एल. सूर्यवंशी, प्रा. एलोरा मित्रा, प्रा. संगिता जोगदंड, डाॅ. निधी अग्रवाल, प्रा. सुनिता वानखेडे, नेहा कपोटे आदी उपस्थित होते.

Exit mobile version