India Ground Report

Nagpur : राज्यातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही : उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

दीपक कैतके
नागपूर : राज्यातील जत(जि. सांगली)मधील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा लढून बेळगाव, कारवार, निपाणी आम्ही मिळविणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोणतेही शत्रुत्व नाही. सीमा प्रश्नावरून निर्माण झालेला वाद हा कायदेशीर लढा आहे, असेही देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सीमाप्रश्नावरील उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत सीमाभागासाठी दोन समन्वय मंत्री नेमण्याचा निर्णय झाला. या निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याची भावना व्यक्त केली असून, याबाबत कर्नाटक सरकार सकारात्मक असल्याचे बोम्मई यांनी म्हटले. यावर आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ साली जत तालुक्यातील गावांनी ठराव केला होता. अलीकडे कोणत्याही गावाने असा ठराव केलेला नाही, असे स्पष्ट केले.

जत तालुक्यातील(Jat taluka) त्या गावांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. आपले सरकार राज्यात असताना कर्नाटकला जेथे पाणी हवे तेथे त्यांनी ते घ्यावे आणि आपल्या गावांना जेथे पाणी हवे, ते कर्नाटकने द्यावे, असा निर्णय झाला होता. त्यानंतर म्हैसाळच्या सुधारित योजनेत त्यांचा समावेश करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. तशी योजना सुद्धा तयार झाली होती. गेल्या सरकारला कोव्हिडमुळे त्या योजनेला मान्यता देता आली नसेल, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे सरकार त्याला तत्काळ मान्यता देईल. या सर्व योजनांना केंद्र सरकारने पैसा दिला आहे, त्यामुळे पैशाची कुठेही कमतरता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नी आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे कर्नाटकच्या(Karnataka) मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. पण, एक नक्की सांगतो की, आम्ही सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडून बेळगाव-कारवार-निपाणीसह आमची गावे मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एकाच देशात राहतो, त्यामुळे शत्रूत्त्व नसले तरी कायदेशीर लढा मात्र आहेच. एकत्रित बैठका घेऊन प्रश्न सुटणार असतील, सिंचनाचे विषय मार्गी लागणार असतील तर अशा बैठका व्हायलाच हव्या.

दिल्लीत(Delhi) हत्या झालेल्या श्रद्धा वालकरने(Shraddha Walker) २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती, तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version