India Ground Report

Nagpur : राज्यपालांना कोंडीत पकडू नका : चंद्रशेखर बावनकुळे

दीपक कैतके
नागपूर : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या ७९व्या वर्षी ‘शिवनेरी’ किल्ला पायी चढून गेले. तथापि, पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणी समर्थन करीत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी नागपूर येथे बोलताना केले.

भाजपचे १८ कोटी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात, त्यामुळे शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल(Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, विरोधी पक्षाने राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजिरवाण्या शब्दात टीका केली. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली, पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट घेतली नसती, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे भाकित केले आहे. याविषयी विचारले असता, सरकार मजबूत आहे. ते कार्यकाळ पूर्ण करेल. विरोधी पक्षातील २० ते २५ आमदारांचे या सरकारला छुपे समर्थन आहे. सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले तर सध्याच्या १६४ पेक्षा खूप जास्त आमदारांचे समर्थन दिसेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेसच्या ५०० सक्रीय आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षांना उमेदवार तरी मिळतात का पहावे, असा चिमटाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी काढला.

Exit mobile version