
मुकुंद लांडगे
मुंबई : (MUMBAI) मूळच्या तामिळनाडू येथील मुंबईत चुकलेल्या एका वृद्ध महिलेस पंतनगर पोलिसांनी शोधून तिच्या मुंबईतील नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पंतनगर पोलीस ठाणे येथील निर्भया पथकाने(Nirbhaya team) ही कामगिरी केली आहे.
घाटकोपरच्या(Ghatkopar) रमाबाई आंबेडकर नगरातील गुरुनानक हायस्कूलजवळ ही वृद्ध महिला चुकून आली होती. याबाबत काल दुपारी निर्भया मोबाईलवर याबाबत संदेश देण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी पंतनगर निर्भया पथकातील महिला अधिकारी निरीक्षक शिंदे, महिला पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस हवालदार यादव हे गेले असता एक वृद्ध महिला(वय अंदाजे ७५ वर्ष) मिळून आली. तिला पोलीस ठाण्यात आणून निर्भया पथकाने चौकशी केली. त्यात तिला मराठी, तसेच हिंदी भाषा येत नसल्याचे समजले. तिची भाषा तामिळ असल्याने तामिळ भाषा जाणणाऱ्या इसमाच्या मदतीने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानुसार, त्या महिलेचे नाव सुब्बूलक्ष्मी मुत्तया पिल्ले असे असून, तिने शिवकाशी, तामिळनाडू येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार, तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरु केला. तामिळनाडू(Tamil Nadu) येथील आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात कुठेही मिसिंगची तक्रार आहे का? याची खात्री केली.
दरम्यान, महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावरून शोध घेत असताना तिचे नातेवाईक(नातू) गणेश राजेंद्र पिल्ले हे कुमार सायकल मार्ट, सेल कॉलनी रोड, चेंबूर(Chembur) येथे राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क करून तिला त्यांच्याकडे देण्यात आले. यावेळी तिने आपण सांगितल्याप्रमाणे १२ नोव्हेंबरपासून चुकून घरातून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. या महिलेस मुंबईतली कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महिलेस तिचे नातेवाईकच असल्याची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचप्रमाणे, सदर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांचे तसेच विशेषत: पंतनगर निर्भया पथकाचे(Pantnagar Nirbhaya squad) आभार मानले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी दिली.