
2 जखमींना राजावाडी रुग्णालयात केले दाखल
पोलीस कुटुंबे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मुकुंद लांडगे
मुंबई : (mumbai)काल(रविवारी) मध्यरात्री २ वाजता घाटकोपरच्या पोलीस वसाहतीतील गोदावरी क्रमांक-१ या इमारतीमधील एका रूमचे छत कोसळून त्यात ज्योती म्हसणे आणि मानव शाह हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात(Rajawadi Hospital) उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या घाटकोपर येथील दक्षता हाउसिंग सोसायटीतील अनेक इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत, त्यामुळे रोजच त्यांचे छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या आठवड्यात अशा ३ घटना घडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या या इमारतींबाबत म्हाडा तसेच पालिकेला पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे आता येथील शेकडो पोलीस कुटुंबे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत, अशी माहिती या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली स्लॅब कोसळण्याची(slab collapses) मालिका अद्याप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल आणि आजही पुन्हा राहत्या इमारतीतील स्लॅब कोसळले आहेत, त्यामुळे येथे राहत असलेल्या पोलीसपत्नी आता पालिका आणि म्हाडा कार्यालयावर आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे त्यांनी याबाबत बोलताना सांगितले.
घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात(Ramabai Ambedkar Nagar) ही जवळपास २३ इमारतींची पोलीस वसाहत आहे. १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या या वसाहतीतील अनेक इमारती या गेल्या वर्षभरापासून मोडकळीस आलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात येथील काही इमारतींचे तब्बल १२ वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात येथील गणेश बिल्डिंगमधील रूम नंबर ८ मध्ये बाळासाहेब काकड यांच्या या रूममधील स्लॅब कोसळले होते. ही घटना ताजी असतानाच आता आज पुन्हा गोदावरी इमारतीतील घराचे छत कोसळून दोघेजण जखमी झाले आहेत, त्यामुळे येथील सर्वच मोडकळीस आलेल्या इमारतीतील पोलीस कुटुंबे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सोसायटीचे पदाधिकारी दशरथ आव्हाड यांनी बोलताना दिली.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर आज सकाळी पंतनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तर पालिकेचे अधिकारी पाठवून याबाबतची महिती घेणार असून, पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक पालिका आयुक्त संजय सोनावणे यांनी सांगितले.
सर्व इमारती धोकादायक
येथील सर्व इमारती या मोडकळीस आल्याने आणि त्यांवर म्हाडा(MHADA), पालिका, तसेच संबंधित यंत्रणांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून येथे राहत आहेत. याबाबत उपाययोजना करावी, म्हणून रहिवासी सतत पालिका आणि म्हाडा उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. मात्र, एकही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप ठोस पाऊले उचलली नाहीत, असा आरोप पदाधिकारी अजय बोडके, रवी दक्षता, रमेश दराडे, मनोज फराटे, संतोष नागरे, रुक्मिणी वारे, अशोक सांगळे, संतोष, गणेश पालवे यांनी बोलताना केला आहे.