
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) मुंबईसह राज्यभरात विविध पदांवर काम केलेले आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने गृहविभागाला पाठविला आहे. यामुळे पोलीसदलात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर नाशिक येथे अधीक्षक म्हणून कार्यरत असताना पिंपळगाव(Pimpalgaon) टोलनाक्यावर एका महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सचिन पाटील हे नाशिक ग्रामीणचे(Nashik Rural) पोलीस अधीक्षक होते त्यावेळी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. गेल्या ऑगस्टमध्ये पोलीस महासंचालकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. सध्या सचिन पाटील हे औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी आहेत. मुंबईतही ते कार्यरत होते. पोलीस महासंचालकांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार, रात्रीच्यावेळी मालेगाववरुन येत असतांना त्यांची गाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडविली होती, त्यामुळे त्यांना राग आल्याने त्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. या झालेल्या वादाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावेळी टोलनाक्यावरील सुरक्षारक्षकही जमा झाले होते. त्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा हेरून सचिन पाटील यांनी कारवाई केली होती.
दरम्यान, शासकीय व्यक्तीला(government person) किंवा वाहनाला टोलनाक्यावर अडवू नये, असा नियम असतांना टोल कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूरस केल्याने हा वाद झाला होता. सचिन पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेली कारवाई चुकीची असल्याने आणि पोलिसांनी दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे टोल प्रशासनाने केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने सचिन पाटील यांच्यावरील आरोपपत्राचा संदर्भ देत पोलीस महासंचालकांना विचारणा केली होती. त्यावरून ऑगस्ट महिन्यात चौकशीचे आदेश देण्यात आले होते, तर त्यावरून आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सचिन पाटील यांच्या टोलनाक्यावरील प्रकरणाची चौकशी करीत पोलीस महासंचालक कार्यालयाला अहवाल सादर केला होता.