India Ground Report

Mumbai : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी नाही

Mumbai: The bail application of Anil Deshmukh is still pending

जेलमधील मुक्काम वाढला
सुधाकर कश्यप
मुंबई : (Mumbai)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी झाली नाही. अनिल देशमुख यांनी सीबीआय प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात 24 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

विशेष सीबीआय(CBI) न्यायालयाच्या जामीन नाकारल्याच्या विरोधात अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केल आहे. न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी दाखल करून घेत या अपिलावर 24 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

अनिल देशमुख यांच्या अपिलावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वैयक्तिक कारणास्तव सुनावणीला असमर्थता दर्शविली. त्यानंतर ॲड. अनिकेत निकम यांनी आज दुपारी न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 24 नोव्हेंबरला निश्चित केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी दिवाळीपूर्वी फेटाळून लावला होता. त्या विरोधात अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. हे अपील सुट्टीकालीन न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख(Sharmila Deshmukh) यांनी त्याची दखल घेऊन नियमित न्यायालयासमोर सुनावणी निश्चित केली होती.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे(Sachin Vaze) सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Exit mobile version