
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) मुंबई महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याला तब्बल ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक(arrested) करण्यात आली आहे. कंपनीतील बेकायदेशीर शेडवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे त्याने ही लाच मागितली होती, असा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश पोवार असे त्याचे नाव आहे.
सतीश पोवार हा अंधेरी येथील के-पश्चिम विभागात कार्यरत असून, तक्रारदाराला त्याने बांधलेल्या बेकायदेशीर शेडबाबत गेल्या १३ ऑक्टोबर रोजी नोटीस दिली होती, त्यामुळे तक्रारदाराने १९ ऑक्टोबर रोजी त्या नोटिसीला उत्तर दिले होते. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी पालिकेच्या के-वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचारी हे शेड तोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर बेकायदेशीर शेडवरील कारवाई थांबविण्यासाठी ५० लाखांची लाच(bribe) मागितली.
दरम्यान, फिर्यादीने याबाबत ३१ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अभियंत्यास ताब्यात घेतले.
घरच्या झडतीत सापडले मोठे घबाड
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(Anti-corruption department) अधिकाऱ्यांनी सतीश पोवार याच्या घराची झडती घेतली. त्यात १ कोटी १३ लाख रोकड आणि १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले.