India Ground Report

Mumbai : डॉ दत्ता सामंत यांच्या आठवणींना उजाळा मिळणार

Mumbai: Memories of Dr Dutta Samant will be brought to life

कामगारांच्या पुढाकारातून साकारली जाताहेत स्मारके
मुकुंद लांडगे
मुंबई: (Mumbai)
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कामगारनेते डॉ दत्ता सामंत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कामगारांनी पुढाकार घेत जिव्हाळा प्रतिष्ठान, इतर कामगार संघटना आणि असोसिएशन ऑफ इंजिनियरिंग वर्कर्स युनियनच्या सहभागाने २ स्मारके उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यातील एक स्मारक भिवंडी – मुरबाड येथील इंदे गावात तर दुसरे नेरळलगतच्या घामोते गावात आहे. यासाठी माझगाव डॉकमधील कामगारांनी खास पुढाकार घेतल्याची माहिती कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांनी दिली. इंदे येथील स्मारकाचे काम २१ नोव्हेंबर २०१९ पासून या डॉ दत्ता सामंत यांच्या जयंती दिनी सुरू केले आहे. येथे ३ एकर जागेत हे स्मारक निर्माण केले जात असून, या ठिकाणी विश्रामगृह उभारून समोरच्या उद्यानात डॉ दत्ता सामंत यांचा ६ फुटी पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असून पुढील वर्षभरात काम पूर्ण होणार आहे. यासाठी कामगारांनी आपल्या वेतनातून आणि निधीतून मोठा हातभार लावला आहे. १६ जानेवारी १९९७ रोजी डॉ सामंत यांची हत्या झाल्यानंतर पुढच्याच वर्षापासून येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले. सोशिभित आलेल्या या स्मारकात कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मुलांसाठी विविध सुखसोयी निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या येथे भव्य अशा ५ रूम तयार करण्यात आल्या आहेत. तर बाजूला निसर्ग जागवण्यासाठी तब्बल १०० फूट खोल विहीर तयार करण्यात आली आहे. तर आणखी सुविधा निर्माणधिन असल्याचे भूषण सामंत म्हणाले. दरम्यान, या स्मारकात कामगारांच्या आरोग्यावर अनेक वैद्यकीय शिबिरे भरवली जाणार आहेत. तर कोणत्याही कामगारांसाठी केवळ १० रुपयांत राहण्याची आणि जेवणासहित इतर सर्व सुविधा या ४० रुपयांत मिळणार आहेत. विशेष म्हणजे येथे नवीन आणि बदलते कामगार कायदे यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात प्राधान्य देण्यात येणार आहे असेही भूषण सामंत यांनी सांगितले.

डॉ दत्ता सामंत यांच्या इंदे येथील स्मारकाचे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र नेरळ येथील डॉ दत्ता सामंत यांनी स्वतः १९९२ साली ही जागा विकत घेऊनही त्यांच्या नातेवाईकातील कौटुंबिक कलहामुळे २०१६ पासून वाद न्यायालयात आहे. मात्र आता तो समेट होऊन मिटणार असून, लवकरच या स्मारकाला गती मिळणार आहे असा विश्वास कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version