India Ground Report

Mumbai : कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा : डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज केली. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच ३० नोव्हेंबर रोजी कुर्ला परिसरातील ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद यांनी मुंबई झोन ५ चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील व तपासी अधिकारी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. तसेच भाभा हॉस्पिटलचे डीन डॅा.डोळस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
यात पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला असून आवश्यक ती कलमे दाखल केली आहेत तसेच वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या अहवालानुसार इतर कलमांचा विचार होईल व कडक कारवाई करण्यात येईल ,अशी माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी डॉ.गोऱ्हे यांना दिली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सदर महिलेचा आत्मविश्वास वाढवा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी सूचना उपायुक्त यांना केली. तसेच पोलिसांनी एक चतू:सुत्री कार्यक्रम राबवावा अशीही सूचना केली. याचबरोबर डॉ.गोऱ्हे यांनी पुढील सूचना देखील पोलिसांना व सरकारला केल्या आहेत यात. पोलिसांनी त्यांच्या झोनच्या हद्दीत जे गुन्हे घडतात व जे आरोपी जामिनावर सुटले असतील त्यांच्या संदर्भात कठोर कारवाई व्हावी.ज्या अपहरण झालेल्या मुलींना पोलीस शोधून काढतात व परत त्यांना मुख्य प्रवाहात आणतात त्या मुलीने परत त्या चक्रात सापडू नये यासाठी या मुलींना सायबर साक्षरता चे ज्ञान देणे आवश्यक आहे. ज्या केसेस मध्ये महिलांविरुद्ध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी एक वेगळी नोंदवही तयार करावी.बीट स्तरावरील महिला मोहल्ला दक्षता समितीच्या बैठका घेण्यात याव्यात.तसेच ज्या केसेसचे बी समरी रिपोर्ट झालेले आहेत त्या केसेसचा आढावा घ्यावा,अशा सूचना पोलीस उपायुक्तांना दिल्या.यावर उपायुक्त मनोज पाटील यांनी या सर्व सूचनांची नोंद घेत संपूर्ण झोन मध्ये याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शक्ती कायदा पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा लवकरात लवकर अमलात यावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंतीही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी राज्य सरकारला केली.

Exit mobile version