
Mumbai : ‘आठ तास ड्युटी’ला आज ‘एवढे’ वर्ष पूर्ण

मुकुंद लांडगे
मुंबई : मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी सुरू केलेल्या ८ तास ड्युटीला आज ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परिमंडळ-६च्या अखत्यारीतील देवनार पोलीस ठाण्यातून(Deonar Police Station) ५ मे २०१६ रोजी प्रायोगिक तत्वावर ही ड्युटी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी सुरू केली होती. या ड्युटीचे लोण राज्यभरात जात असताना आणि याबाबतचा सरकारी अध्यादेश काढण्याचा प्रयत्न होत असतानाच ती २०२० नंतर कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आली होती. आता मुंबई पोलिसांसाठी ती सुरू होत आहे.
कोरोनामुळे ‘ही’ ड्युटी बंद करण्यात आली
पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागातील देवनार पोलीस ठाण्यातून सुरू झालेल्या या ८ तास ड्युटीसाठी अप्पर पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या प्रयत्नाने या परिमंडळात सुरुवातीला या ड्युटीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर ही ड्युटी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील ९३पैकी जवळपास ७० पोलीस ठाण्यातून सुरू झाली होती. त्यानंतर राज्यभरात ती सुरू करण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे त्यावेळी या ड्युटीसाठी सरकारी अध्यादेश काढण्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनातही यावर सखोल चर्चा झाली. मात्र, कोरोनाच्या(Corona) पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० नंतर ही ड्युटी बंद करण्यात आली होती, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, पोलीस दलातील जवानांना त्यांच्या कुटुंबाकडे, आरोग्याकडे, तसेच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळावा म्हणून देवनार पोलीस ठाण्यातील शिपाई रवींद्र पाटील यांनी या ड्युटीबाबत तब्बल ७३ पानी एक अहवाल तयार करून तो तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर(Datta Padsalgikar) यांना सादर केला होता. त्यानुसार पडसलगीकर यांनी यावर अवलोकन करून या ड्युटीची सुरुवात देवनार पोलीस ठाण्यातून सुरू केली होती. या ड्युटीला आज ६ वर्षे झाली असून, यापुढे मुंबईभरातील पोलीस ठाण्यातून ती राबविण्यात येत आहे.
आठ तास कर्तव्यात महिलांना प्राधान्य
कोरोना काळात ही ड्युटी बंद करण्यात आली असली, तरी गेल्यावर्षी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ३ मेपासून राज्यभरातील महिला पोलिसांसाठी टप्या-टप्याने ही ड्युटी सुरू केली.
महिलांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेत संजय पांडे यांनी तीन महिन्यांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनीही यासाठी लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर अमरावती शहर, पुणे ग्रामीण, तसेच नागपूर शहर पोलिसांसह इतरही ठिकाणी ही ड्युटी सुरू केली आहे.
आठ तास कर्तव्यासाठी समिती गठित
मुंबईतील महिला आणि पुरुष पोलिसांना सरसकट आठ तास ड्युटी व्हावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे(Sanjay Darade) यांच्या अध्यक्षतेखालील सध्याचे आयुक्त संजय पांडे(Sanjay Pandey) यांनी एक समिती गठित केली आहे. समितीचे काम सध्या संपले असून, मुंबईत ही ड्युटी सुरू करण्यात येत आहे.