India Ground Report

Mumbai : अजित पवारांचे आरोप अस्वस्थतेतून; चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याची केली मागणी

दीपक कैतके
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार(Ajit Pawar) हे सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काहीतरी आरोप करीत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी मंगळवारी दिले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस प्रशासन, सचिव यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप केला. या आरोपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला.

राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे. ते कधीही सत्तेचा दुरुपयोग करीत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने गुंडाराज संपविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बलात्काऱ्याला संरक्षण देण्यात आले. गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले, मंत्र्यांच्या बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिली. राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले. चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले. यामुळे अजित पवार यांना बोलण्याचा काही अधिकार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अजित पवार यांनी केलेली खेळी योग्य होती की शरद पवार यांची चाल बरोबर होती यावरून त्या पक्षात संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशा अस्वस्थतेतून अजित पवार माध्यमांमध्ये जागा मिळविण्यासाठी आरोप करीत आहेत, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

दरम्यान, लव्ह जिहादमध्ये(Love Jihad) हिंदू मुलींना पद्धतशीर फसविण्यात येते. लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Exit mobile version