
West Bengal: पार्थ चॅटर्जी यांना भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात केले दाखल

एअर ऍम्ब्युलन्सने भुवनेश्वरला नेण्यात आले
Indiagroundreport वार्ताहर
कोलकाता: (west bengal) पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले माजी शिक्षणमंत्री(Former Education Minister) पार्थ चॅटर्जी यांना उपचारासाठी भुवनेश्वर एम्समध्ये नेण्यात आले. पार्थ चॅटर्जी यांना भुवनेश्वरला नेण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते. शनिवारी त्यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांना बँकशाल कोर्टातील विशेष सीबीआय कोर्टात हजर केले. न्यायालयाने पार्थ चॅटर्जी यांना सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते.
पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याचा दावा केला
ईडीने रविवारी पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती ठीक असल्याचा दावा केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास कमांड हॉस्पिटल किंवा ईएसआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश द्यावेत, त्यानुसार ईडीच्या वतीने कोलकाता उच्च न्यायालयात सायंकाळी उशिरा मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येऊन त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल सौमेंद्र नाथ मुखर्जी यांनी एसएसकेएमच्या डॉक्टरांचा अहवाल सादर केला आणि पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याचा दावा केला. यानंतर न्यायालयाने पार्थ चॅटर्जी यांना एअर ऍम्ब्युलन्सने भुवनेश्वरला(Bhubaneswar) नेण्याचे आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळी त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने भुवनेश्वरला नेण्यात आले.
चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्तीतही भ्रष्टाचार केला असल्याची शक्यता
ईडीच्या(ED) एका सूत्राने सांगितले की, पार्थ चॅटर्जीच्या निवासस्थानावर शुक्रवार आणि शनिवारी 28 तास सतत झडती घेतली असता, शिक्षक भरती सोबतच चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्तीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्याकडे आढळून आलीत, त्यामुळे या प्रकरणातील भ्रष्टाचारातही चॅटर्जी यांचाही हात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.