
Thane : हत्याप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप

समर प्रताप सिंग
ठाणे : पूर्ववैमनस्येतून दोघा आरोपींने मृतक रईस ऊर्फ रोशन शेख मद्यधुंद असताना त्याची हत्या करून मृतदेह मीरा-भायंदर पालिकेच्या सेव्हरेज प्लांटजवळ(sewerage plant) पुरल्याप्रकरणी न्यायालयात सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांनी आरोपी सोहेल मुख्तार शेख(३४) आणि अली ऊर्फ नौशाद इर्शाद शेख(३७) यांना जन्मठेप आणि दहा हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील एस. पी. मोराळे यांनी युक्तीवाद केला.
मृतक रईस ऊर्फ रोशन शेख याचे पूर्ववैमनस्य हे आरोपी सोहेल मुख्तार शेख आणि अली ऊर्फ नौशाद इर्शाद शेख यांच्याशी होते. ही घटना ९ जुलै, २०१६ रोजी घडली. रात्री २ ते सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृतक रईस आणि आरोपी हे मद्यप्राशन करीत बसले होते. त्यात त्यांच्या अज्ञात कारणावरून वाद झाला आणि दोघा आरोपींनी त्याची निघृण हत्या केली आणि मृतदेह हा मिरा भायंदर पालिकेच्या सेव्हरेज प्लांटजवळ गाडला. त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षक याच्यामुळे या घटनेचा उलगडा झाला आणि आरोपी सोहेल मुख्तार शेख(३४) आणि अली ऊर्फ नौशाद इर्शाद शेख(३७) यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान सदर हत्या प्रकरण(murder case) हे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी सुरु होते. मात्र, सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर साक्षीदार आणि सुरक्षारक्षक यांच्या साक्षीला ग्राह्य धरून न्यायमूर्ती गोंधळेकर यांनी आरोपींना सबळ पुराव्यामुळे जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.