
Thane : मनपा आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

४० ते ५० टक्के नालेसफाई पूर्ण
समर प्रताप सिंग
ठाणे : पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजनासोबत यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू केली असून, महापालिका आयुक्त(Municipal Commissioner) डॉ. विपीन शर्मा यांनी आज शहरातील नालेसफाई कामाची पाहणी केली. दरम्यान पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतानाच उर्वरित नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी घनकचरा विभागास दिले.
आज सकाळी ८:३० पासून महापालिका आयुक्त बिपीन शर्मा(Bipin Sharma) यांनी कै. महादेव पाटील चौक, पाचपाखाडी येथून नालेसफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यास माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, दीपक वेतकर, एकनाथ भोईर, माजी नगरसेविका रुचिता मोरे, दीपा गावंड, मिनल संख्ये, सुवर्णा कांबळे, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपआयुक्त मनीष जोशी, उपआयुक्त दिनेश तायडे, उपआयुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.
शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात, परंतु यावर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी(JCB) व पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्याचे काम व्यापक प्रमाणात सुरु आहे.
यावेळी कै. महादेव पाटील चौक, पाचपाखाडी येथील नाला व रुणवाल सर्व्हिस रोड येथील नाल्याची पाहणी केली. ज्ञानसाधना कॉलेज, धर्मवीरनगर, सुपरमॅक्स कंपनी, ब्राडमा कंपनी, तसेच वागळे बस डेपो येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्यांची खोली वाढविणे, नाल्यांच्या बाजूची पडलेल्या भिंती बांधणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दूर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी संबंधितांना दिल्या.
दरम्यान चिखलवाडी(Chikhalwadi) येथे मूसळधार पावसात नेहमीच पाणी साचते, त्याठिकाणी जून महिन्यातच सबमर्सियल पंप लावण्याचे निर्देश देतानाच इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वागळे प्रभाग समितीमधील पडवळनगर येथील नालेसफाईची पाहणी करून त्याठिकाणी कल्व्हर्टचे काम तातडीने पूर्ण करणे, तसेच याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत केबल्स तात्काळ काढण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.