
Thane: उद्ममिता यात्रेचे ठाण्यात आगमन

अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या शुभेच्छा
समर प्रताप सिंग
ठाणे: (thane) राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी आयोजित राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आज ठाणे जिल्ह्यात आगमन झाले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे(Vaidehi Ranade) यांनी या यात्रेचे स्वागत करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांना प्रशिक्षण मिळेल, अशी आशा व्यक्त केली. पुढील तीन दिवस ही यात्रा जिल्ह्यात राहणार असून डोंगरी पाडा येथील श्री गणेश सभामंडपात तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
युथ एड फाऊंडेशन(Youth Aid Foundation) यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता युथ फाऊंडेशन संस्थेमार्फत बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचा शुभारंभ नुकताच मुंबईत झाला आहे. त्यानंतर ही यात्रा आजपासून तीन दिवस ठाणे जिल्ह्यात राहणार आहे. यात्रेच्या रथाचे स्वागत अतिरिक्त जिल्हाधिकीरी श्रीमती रानडे यांनी केले आहे.
राज्यात उद्यमशीलता वाढवण्यास ही यात्रा महत्वाची ठरेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी सूक्ष्म व्यवसाय प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन श्रीमती रानडे यांनी यावेळी केले. या यात्रेच्या कालावधीत पुढील तीन दिवस ठाण्यातील डोंगरीपाडा येथील श्री गणेश सभामंडप येथे तरुणांना सूक्ष्म व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती साळुंखे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, युथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मॅथ्यू मत्तम, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मिलिंद भोसले, उद्यामिता राज्य समन्वयक मनोज भोसले, महात्मा गांधी फेलो जितेंद्र रांजणे, अण्णासाहेब आथिर्क विकास मागास महामंडळ प्रशांत कांबळे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रविंद्र सुरवसे, राजू साबळे आदी उपस्थित होते.
अशी आहे उद्ममिता यात्रा
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 40 दिवस सुमारे 4 हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये 40 उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजारहून अधिक युवकांना भेटतील. त्यांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देतील. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे उद्योगाच्या नवनव्या संकल्पना आहेत अशा युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम यात्रेदरम्यान राबविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व 36 जिल्ह्यामध्ये डिसेंबरअखेर 4 हजार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी विपणन सहाय्य प्रदान करण्याबरोबरच संबंधीत युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शक्य असेल त्या सरकारी योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.