
Sangali : संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये पटकाविले रौप्यपदक

Indiagroundreport वार्ताहर
बर्मिंगहॅम : सांगलीतील(Sangli) चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम( इंग्लड) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. संकेत महादेव सरगर याने ५५ किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पाहिले पदक मिळवून दिले आहे. संकेतच्या या यशाचे संपूर्ण देशभर कौतुक होत आहे. संकेतचा वडील असल्याचा अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संकेतचे वडील महादेव सरगर यांनी त्याने रौप्यपदक पटकाविल्यानंतर दिली.
संकेत सरगर(Sanket Sargar) याचे वडील महादेव सरगर हे चहाविक्रेते आहे. सांगली शहरातील संजयनगर याठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून, यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून, व्यवसायाच्या निमित्ताने ते सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहाविक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल याठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजीविक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दाम्पत्य राबतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली.
संकेतच्या यशानंतर त्याचे वडील महादेव सरगर(Mahadev Sargar) म्हणाले की, माझ्या मुलाने पदक मिळविले, ती आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आम्ही त्याच्यासाठी जे कष्ट घेतले, त्याने त्याला न्याय दिला. त्यात संकेतच्या प्रशिक्षकाने जे कष्ट घेतले त्यालाही त्याने न्याय दिला. संकेतचा वडील असल्याचा अभिमान वाटत आहे. माझा मुलगा संकेत आणि मुलगी काजल या दोघांनी देशात खूप नाव कमवावे. त्याचे ऑलम्पिकसाठी प्रयत्न सुरू आहेत. तो ऑलम्पिकमध्ये देखील यश संपादन करेल.
संकेतने कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्यानंतर त्याची आई राजश्री सरगर(Rajshree Sargar) या म्हणाल्या की, आमचा हॉटेलचा व्यवसाय आहे. माझे दोन्ही मुलेही खूप कष्ट करतात. आम्हाला तीन मुले आहेत. माझे दोन्ही मुलं वेटलिफ्टिंग करतात. एक मुलगा शिक्षण घेत आहे. हॉटेलात जास्त ग्राहक असल्याने आजही आम्हाला टीव्ही पाहायला मिळाला नाही. त्याच्या सरांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचे खूप आभार. त्याचा सर्व खर्च त्याचे सर पाहत होते. आमच्याकडून काही थोडाफार खर्च करण्यात येत होता, त्यामुळे त्यांचे खूप आभार.