
Pune : ‘त्या’ गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरू

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : पुणे महापालिकेत(Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना महापालिकेने आता या गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जलवाहिनी टाकणे, टाक्या बांधणे अशी कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे या गावामध्ये काम केले जाणार आहे.
राज्य सरकारने(The state government) पुण्याच्या हद्दीलगतची २३ गावे ३१ जुलै २०२१ रोजी पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्यात समन्वय यावा, नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी महापालिकेने या गावांचा समावेश केला आहे. या भागात नव्याने होणाऱ्या बांधकामांच्या ठिकाणी प्रचंड पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. सोसायट्यांचे टँकरवर लाखो रुपये दर महिन्याला खर्च होत आहेत. या बांधकामांना पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे परवानगी देताना संबंधित ठेकेदारांना पाणीपुरवठा करावा, यासाठी त्याच्याकडून हमीपत्र घेतले होते, पण प्रत्यक्षात सद्य:स्थितीत नागरिकांनाच पाण्याची सोय करावी लागत आहे.
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) याचिका दाखल झाली होती, त्यात न्यायालयाने महापालिकेला जोपर्यंत पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करा, असा आदेश दिला आहे. २३ गावांतील लोकसंख्येचा विचार करता वर्षाला यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत, त्यामुळे महापालिकेने या गावांत समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे व गावांमधील सध्या अस्तित्वातील यंत्रणा सुधारणे यावर भर दिला.