
Pune : पुण्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मोक्का कारवाई

मुकुंद लांडगे
पुणे : (Pune) पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) याची काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगकडून हत्या झाली होती. त्यात पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांची नावे समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरातील विमानतळ, येरवडा आणि चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत रोहन गायकवाडसह आठ साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता(Amitabh Gupta) यांनी मोक्कानुसार केलेली ही तब्बल ८५वी कारवाई आहे.
गँगस्टरांची यादी केली तयार
रोहन अशोक गायकवाड याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरूद्ध काल ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या टोळीचे वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी विमानतळ येरवडा चंदननगर परिसरातील(Chandannagar area) नागरिकांमध्ये दहशत माजविली होती. खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. त्यामुळे त्यातील सदस्यांवर ही कारवाई झाली आहे. मोक्कानुसार या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. त्यानंतर ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी केली आहे. तर पुण्यात सध्या वाढत असलेल्या गुंडगिरीचा खात्मा करण्यासाठी आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आता ठोस पाऊले उचलत गँगस्टरांची यादीच तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले.