
Parbhani : तरुणाची निर्घृण हत्या

Indiagroundreport वार्ताहर
परभणी : परभणीच्या(Parbhani) पूर्णा शहरातील महात्मा फुले नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे, तर त्या युवकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकार मंगळवार २१ जून रोजी समोर आला आहे. ओमकार नारायण पवार (रा. शेंडूर, तालुका-औंढा, जिल्हा-हिंगोली) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी पोलिसांनी केली पाहणी
पूर्णा(Purna) शहरातील तहसील कार्यालयाच्या लगत असलेल्या महात्मा फुले नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणाच्या विद्युत रोहित्रजवळ २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे पूर्णा शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे.
५ दिवसांमध्ये पूर्णा शहरात हत्येची दुसरी घटना
मागील ५ दिवसांमध्ये पूर्णा शहरात ही हत्येची दुसरी घटना आहे. याअगोदर थट्टा मस्करीतून एका ५६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची(railway employee) चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. ५ दिवसात दोन हत्येच्या घटना घडल्यामुळे पूर्णा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्णा शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
सदरील युवकाच्या खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस तपासातून खुनाचे कारण समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खून करणारे आरोपी कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.