
Panvel: एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करा : शिरीष घरत

पुरुषोत्तम कनौजिया
पनवेल : (panvel) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी(Shiv Sena workers) मंगळवारी सायंकाळी पनवेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. यासोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा पोस्टरवरील फोटो ब्लेडने फाडला. शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना गद्दार ठरविले.
गद्दारांना माफी नाही
शिवसेना पनवेल शहरप्रमुख शिरीष घरत(Shirish Gharat) म्हणाले की, धर्मवीर चित्रपटात आपण नुकतेच पाहिले होते, त्यात आनंद दिघे यांनी गद्दारांना माफी नाही, असे म्हटले होते. आम्ही आनंद दिघेंचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे गद्दारांना माफ करू नये.
महाराष्ट्रातील सरकार संकटात
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे त्यांच्या अनेक आमदार सहकाऱ्यांसह गुजरातमधील सूरत येथे गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार संकटात असून, कधीही पडू शकते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे तगडे नेते मानले जातात. तिकीट वाटपापासून ते पक्षाच्या जवळपास सर्वच कार्यात त्यांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांची पक्षात चांगली पकड आहे. त्यामुळे आज ‘वर्षा’ बंगल्यातील आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत. याआधीही शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे. ज्यात छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे ही आहेत. त्यापैकी नारायण राणे(Narayan Rane) हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून उद्धव सरकारमध्ये मंत्री आहेत. दुसरीकडे, गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १५ वर्षे मंत्री होते आणि सध्या ऐरोली विधानसभेचे आमदार आहेत, तर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, ज्याचे ते आजही अध्यक्ष आहेत.