
New Delhi : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) 46 वर्षाचा होता. गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, मात्र यश आले नाही.
टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री 10.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाला होता तेव्हा अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता, असे क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितले.
एलिस रिव्हर ब्रिजजवळ हा अपघात झाला. या अपघातात अँड्र्यू सायमंड्सला गंभीर दुखापत झाली होती. शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू होता. सायमंड्सने आपल्या कारकिर्दीत एकूण 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २००३ आणि २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत सायमंड्सचे महत्त्वाचे योगदान होते.काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आणि आता अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.