
New Delhi : सोनिया गांधींनी ईडीकडे मागितली हजेरीकरिता मुदतवाढ

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी ईडीला पत्र पाठविले आहे.
चौकशी पुढे ढकलण्याची विनंती
नॅशनल हेरॉल्डशी(National Herald) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनियांना 13 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे पत्र पाठविले होते. परंतु, तत्पूर्वी सोनियांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. त्यानंतर कोरोनामुळे फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर गुरुवारी 23 जून रोजी त्या ईडी चौकशीला हजर राहणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाला(ED) पत्र पाठवून चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
यासंदर्भात काँग्रेस नेते एस. जयराम रमेश(S. Jairam Ramesh) यांनी ट्वीट करीत सांगितले की, सोनियांना डॉक्टरांनी घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, प्रकृती पूर्णपणे बरी होईपर्यंत चौकशी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.