
New Delhi : जेरेमी लालनिरुंगा याने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दुसरे सुवर्णपदक व एकूण पाचवे पदक जिंकले
Indiagroundreport वार्ताहर
बर्मिगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा(Jeremy Lalrinunga) याने स्पर्धेदरम्यान दुखापत होऊनही हार मानली नाही आणि पुरुषांच्या 67 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक आणि एकूण पाचवे पदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगाने स्नॅच राउंडमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने एकूण 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. तर सामोआच्या वायवापा आयोनने (२९३ किलो) रौप्यपदक जिंकले.
जेरेमीने स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात 136 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदकाच्या(gold medal) स्थानावर पोहोचला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचलले आणि खेळातील विक्रम प्रस्थापित करून आपली स्थिती मजबूत केली. जेरेमीने 143 किलो वजनाचा तिसरा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.
भारतीय वेटलिफ्टरने(weightlifter) क्लीन अँड जर्क राउंडमध्ये पहिल्या प्रयत्नात १५४ किलो, तर दुसऱ्या प्रयत्नात १६० किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 164 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मात्र, असे असतानाही त्याने सुवर्णपदक जिंकले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात जेरेमी जखमी झाला. असे असूनही तो उचलण्यासाठी आणखी दोनवेळा आला.
जेरेमी लालनिरुंगा 2018 च्या युवा ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता आहे. यासोबतच त्याने 2021 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले.