
New Delhi : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखर विजयी

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर(Jagdish Dhankhar) विजयी झाले आहे, त्यामुळे जगदीप धनखर हे भारताचे १६ वे उपराष्ट्रपती ठरणार आहेत. देशाच्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदान पार पडले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान पार पडले.
या निवडणुकीत जगदीप धनखर यांना ५२८ मते मिळाली, तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली, अशी माहिती समोर येत आहे.
जगदीप धनखर यांचा विजय झाल्यानंतर भाजप(BJP) कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय झाल्याने जगदीप धनखर हे भारताचे नवे उपराष्ट्रपती होणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी जगदीप धनखर हे उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
जगदीप धनखर यांचा राजस्थानातील(Rajasthan) झुनझुनू जिल्ह्याच्या किठाना या गावात जन्म झाला. बारावीनंतर त्यांनी पदार्थ विज्ञानामध्ये(material science) पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. जगदीप धनखर हे आयआयटी, एनडीए आणि आयएएस परीक्षाही उत्तीर्ण आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाबरोबरच विविध राज्य आणि सुप्रीम कोर्टातही वकिली त्यांनी केली आहे. जगदीप धनखर हे १९८९ ला जनता दलाच्या उमेदवारी पहिल्यांदा झुनझुनूचे खासदार होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करून किशनगड येथून १९९३ मध्ये आमदार झाले. २००३ ला काँग्रेसशी फारकत घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ३० जुलै २००९ रोजी त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी(Governor) निवड करण्यात आली.