
New Delhi: राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

प्रशांत बारसिंग
नवी दिल्ली : (new delhi) सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचे संजय राऊत(Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयूष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. 31 मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, 10 जून रोजी मतदान होईल.
राज्यसभेच्या(Rajya Sabha) पंधरा राज्यातील 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्यसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या सहा खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल(Praful Patel), शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता आहे. तर पीयूष गोयल हे केंद्रीयमंत्री असल्यामुळे भाजपकडून त्यांचीही उमेदवारी निश्चित असेल. राज्यातील भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत, परंतु महाविकास आघाडीची विधानसभेतली एकत्र ताकद लक्षात घेता भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. तिसऱ्या जागेसाठी काही मते कमी पडत असल्यामुळे या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होऊ शकते.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून(Maharashtra) 19 जागा आहेत. यात भाजपचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे तीन, रिपाइं(आठवले गट) एक आणि एका अपक्ष खासदाराचा समावेश आहे.
संभाजीराजे लढविणार अपक्ष निवडणूक
राज्यसभेची आजच निवडणूक(election) जाहीर झाली आहे आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आज राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याचे जाहीर केले आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. ही निवडणूक लढण्यासाठी अनुमोदक म्हणून दहा आमदारांची आवश्यकता असते, त्यामुळे हे दहा आमदार संभाजी राजे यांना मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.