
Navi Mumbai: पनवेल मनपा गर्भपाताबाबतच्या ‘त्या’ नियमांची करणार अंमलबजावणी

24 आठवड्यांवरील गर्भपाताचा सल्ला घेणे आवश्यक
ज्योती दुबे
नवी मुंबई : (navi mumbai) गर्भपाताबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महापालिकेने(Panvel Municipal Corporation) एक समितीही स्थापन केली आहे.
गर्भपाताचा सल्ला देण्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बोर्डाने गर्भपाताची विनंती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत गर्भपात मंजूर करण्याची किंवा नाकारण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वैद्यकीय समित्या स्थापन
केंद्र सरकारने 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात(abortion) स्वेच्छेने कायदेशीर केला आहे. जर गर्भधारणेचा कालावधी 24 आठवड्यांपेक्षा जास्त असेल, तर वैद्यकीय गर्भपाताला राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाने स्थापन केलेल्या वैद्यकीय समितीने मान्यता दिली पाहिजे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वैद्यकीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा वैद्यकीय समितीकडे गर्भपातासाठी अर्ज करता येतो. ही समिती गर्भवती महिलेची आणि तिच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करणार आहे. त्यानंतर गर्भपात करायचा की नाही, हे समिती ठरवेल. वैद्यकीय समितीने विनंती प्राप्त केल्यापासून तीन दिवसांच्या आत फॉर्म-डीमध्ये मान्यता किंवा नकार देणे आवश्यक आहे. वैद्यकीय समितीने मान्यता दिल्यास, योग्य सल्लामसलत आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन गर्भपाताची प्रक्रिया मान्यताप्राप्त वैद्यकीय गर्भपात केंद्रात पाच दिवसांच्या आत पार पाडावी लागणार आहे.
एमटीपीसंदर्भात बैठक
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर(Palghar), रायगड यासह महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये गर्भपाताचा सल्ला देण्यासाठी वैद्यकीय समित्या स्थापना करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीच्या मान्यतेनंतरच MTP केंद्र 20-24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकतील. सर्व मान्यताप्राप्त एमटीपी केंद्रांना संबंधित नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.