
Nanded : धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय भवनला भेट देऊन एसटीपी युनिटची केली पाहणी

नांदेड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (State Minister for Social Justice Dhananjay Munde) , राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी येथील सामाजिक न्याय भवन येथे भेट दिली. सामाजिक न्याय भवनच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून (STP) फुलविण्यात आलेल्या परिसरातील बगीच्याची पाहणी त्यांनी केली. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी नांदेड शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध ठिकाणी हे एसटीपी प्रकल्प बसविण्यात आले असून पाण्याच्या पुनर्वापराचा नवा मापदंड निर्माण केला आहे. नाविन्यपूर्ण या प्रकल्पाचे त्यांनी कौतूक केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून त्यांनी अधिक माहिती समजून घेतली.
सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्याचबरोबर डिजिटल स्टँडीद्वारे शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार होण्याच्या विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल स्टँडीचेही त्यांनी अवलोकन केले.