
Mumbai: मी सोबत असताना भाजपला “यांची” काय गरज ? : रामदास आठवले

प्रशांत बारसिंग
मुंबई: (Mumbai) सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, राज ठाकरेंच्या(Raj Thackeray) मनसे बरोबर युती करणे भाजपला परवडणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सबका साथ सबका विकास, सबका विश्वास” ही भूमिका मांडली आहे, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, महाराष्ट्र मध्ये भाजप आणि आरपीआय सोबत पुन्हा सत्ता प्राप्त करून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे असे आठवले म्हणाले आहेत.
कोरेगाव भीमा दंगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा हात !
कोरेगाव भीमा दंगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता, असा गंभीर आरोप आठवले यांनी केला आहे. कोरेगाव भीमा मध्ये झालेली दंगल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पध्द्तीने हाताळली होती, त्यामुळे या दंगलीचे महाराष्ट्र मध्ये कुठेही पडसाद पडले नव्हते. भाजप सरकारने दंगल वाढवण्याचा विषय येत नाही, त्यावेळी भाजपचे सरकार होते मात्र दंगल करणारे भाजपचे लोक नव्हते. दंगलीत स्थानिक लोक होते, त्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षाचीही लोक होती असे आठवले म्हणाले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री हा ब्राम्हण समाजाचा होईल. आणि तो मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, सक्षम असणारे नेतृत्व आहे, मागील 5 वर्षात भाजपला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, ती समाजात वाद निर्माण करणारी आहे, राज यांची भूमिका सामाजिक नसून धार्मिक आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये राज ठाकरे यांना विरोध होत असावा, असे आठवले म्हणाले आहेत.
राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत !
सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत, बाळासाहेबांची कॉपी करणे एवढे सोपे काम नाही, असे आठवले म्हणाले आहे.