
Mumbai : उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिंदे, फडणवीस यांनी ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळला

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai) माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आज वाढदिवस(Uddhav Thackeray’s birthday) असून, त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना त्यांनी फक्त माजी मुख्यमंत्री असे म्हटले असून, शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख केला नाही, तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या नेत्यांनी मात्र त्यांचा उल्लेख पक्षप्रमुख असा केला आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस असून त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी त्याबाबतचे ट्विट केले आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शुभेच्छा देताना ट्विट केले की, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अनेकानेक शुभेच्छा!, मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतीतो!
शिंदे-फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणे टाळले असले, तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या नेत्यांनी ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हटले आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार धैर्यशील माने यांनी पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड केलेल्या नेत्यांनी आम्ही अद्याप शिवसेनेत असल्याचे सांगितले आहे. आम्ही बंड केले नसून, वेगळा गट तयार केला आहे. तसेच खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावाही त्यांनी केला असून, यासाठी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शिंदे -फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.