
Mumbai : कोठे झाले सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन?

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुकुंद लांडगे
मुंबई : ध्वनिक्षेपकांचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या(Supreme Court) आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून विक्रोळी येथील एका मदरशामध्ये अजानची बांगवरून पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांताक्रूझ आणि वांद्रे येथील दोन मशिदींच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भोंग्यांबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची घटना ताजी असतानाच आता असाच प्रकार पार्क साईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे. येथील एका मशिदीतील रोज बांग देणारा बांगी हा टिटवाळा येथे गेला असता दुसऱ्या बांग देणाऱ्याने मोठ्या आवाजात बांग दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी आज दिली.

विक्रोळी पश्चिमेकडील(Vikhroli West) एका मदरशाच्या पदाधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत पोलिसांची परवानगीही घेण्यात आली नव्हती. येथील अमृत रोड येथे सुन्नी गोसय्या मदरसा आहे. रविवारी पहाटे ५ वाजता ध्वनिक्षेपकाचा वापर करून मोठ्या आवाजात अजान देण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मदरशातील अहमद रजा वाहेदुर रेहमान यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेहमान यांना नोटीसही बजाविण्यात आली आहे. यापूर्वी मदरशाकडून ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, या कारवाईनंतर मदरशाकडून(madrassa) ध्वनिक्षेपकाच्या वापरसाठी पार्क साईट पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवरच हा अर्ज मंजूर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी सांगितले.
घाटकोपर-विक्रोळी दरम्यान गस्त घालत असताना हा प्रकार समोर आला. त्यामुळे पोलिसांनीच फिर्यादी होत झावरू गुजर या अंमलदाराने हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे आणि सूचना काय आहेत याबाबतची माहिती पोलीस ठाण्याच्या(police station) हद्दीतील सर्व मशिदींच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या, तरीही असा प्रकार घडल्याने गुन्हा दाखल केला, असे विनायक मेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पार्क साईट पोलीस ठाणे) यांनी सांगितले.